अखेर पातूरच्या नगराध्यक्ष अपात्र घोषित, जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

0
60

(प्रतिनिधी- सचिन मूर्तडकर):– जात प्रमाणपत्र सादर करण्यात झालेला घोळ आणि मुदतीपूर्वी जातवैधता प्रमाणपत्र सादर न करण्याच्या मुद्यावरून अकोल्‍याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांना अपात्र घोषित केले आहे. पातूरचे रहिवासी नईमखान जहाँगीरखान यांनी याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना जिल्‍हाधिकाऱ्यांनी आज हा निकाल दिला.

पातूरच्या नगरसेविका म्‍हणून निवडून आल्‍यानंतर प्रभा भीमराव कोथळकर यांनी पातूरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 28-10-16 रोजी अर्ज भरला होता व त्यात 28-11-16 रोजी पातूरच्या नगराध्यक्ष म्‍हणून निवडूनही आल्‍या होत्या. मात्र, नगराध्यक्षपदाचा अर्ज भरताना प्रभा कोथळकर यांनी ‘डोल्‍हार’ जातप्रमाणपत्र सादर करताना आपल्‍या माहेरच्या नावे असलेले प्रमाणपत्र सादर न करता लग्नानंतर पतीच्या नावाने असलेले जातप्रमाणपत्र नगराध्यक्षपदाच्या अर्जासोबत जोडले होते. त्याच्या पुराव्याप्रीत्यर्थ विभागीय जातपडताळणी समितीकडे केलेल्‍या अर्जाची सत्यप्रतही नामांकन अर्जासोबत जोडली होती. यावरच याचिकाकर्ते नईमखान जहांगीरखान यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, 28-11-2016 रोजी नगराध्यक्षपदी विराजमान झाल्‍यानंतर त्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत (दि.27-5-2017पर्यंत) वैध जातप्रमाणपत्र दाखल करणे भाग असतानाही त्या ते करू शकल्‍या नाहीत, याकडेही याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले होते. दोन्हीकडील युक्तिवाद ऐकल्‍यानंतर जिल्‍हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी जातप्रमाणपत्र वैधता आणि निर्गमन आणि नियंत्रण कायदा 2000 चे कलम 10 (4) आणि नगरपालिका कायदा 1965 चे कलम 9 (अ) जातवैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या आत सादर करणे या कायद्यांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी पातूरच्या नगराध्यक्षा प्रभा भीमराव कोथळकर यांना अपात्र घोषित केले. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. रहाटे यांनी, तर प्रभा कोथळकर यांच्या वतीने ॲड. राम सोमाणी यांनी काम पाहिले. पातूरच्या नगराध्यक्षा प्रभा कोथळकर या नगराध्यक्षपदी निवडून आल्‍यानंतर विहित सहा महिन्यात आपले जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकल्‍या नाहीत, असे पत्रही पातूर न.प. मुख्याधिकाऱ्यांनी 12-6-2017 रोजी निवडणूक यंत्रणेला पाठविले होते, हे विशेष. हा मुद्दाही याचिकाकर्त्याने प्रकर्षाने मांडला होता.