काँग्रेसचे जेष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन…

(प्रतिनिधी):- माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते कर्करोगाच्या आजाराला झुंज देत होते. मात्र, काल रात्री त्यांनी कर्करोगाच्या आजाराला झुंज देतांना मुंबईतील लीलावती रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पतंगराव कदम यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. परखड आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले पतंगराव कदम राजकारणात गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत होते. काँग्रेसशी निष्ठावंत असलेल्या पतंगराव यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तब्बल वीस वर्षाहून अधिक काळ अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये मदत, शिक्षण सहकार, वने, पुनर्वसन व महसूल, उद्योग, या खात्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचे अनेकदा नाव आले. तत्परतेने आणि धाडसी निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांची राज्यात प्रचिती होती. आताच्या पलूस कडेगाव मतदारसंघातून तब्बल सहा वेळा ते निवडून आले. राज्याच्याच नाहे तर देशातील राजकारणातही त्यांचा तितकाच धाक होता. एका छोटय़ा कुटुंबातून पुढे आलेले हे राजकिय वादळाच होते असे म्हणायला हवे. पतंगराव कदम गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यासाठी त्यांना ३ मार्च रोजी मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आजच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी लीलावती रूग्णालयात जावून त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची विचारपूस केली होती. पतंगरावांच्या निधनाने काँग्रेसचे आणि महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.