बोगस अपंग प्रमाणपत्र स्टिंग ऑपरेशन आले अंगलट, मुकीम अहमद याला अटक…

0
71

(प्रतिनिधी- हेमंत जाधव):- सन २०१० मध्ये अकोल्याचे सामाजिक कार्यकर्ता मुकीम अहमद आणि त्यांच्या ३ सहकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगांचे बोगस प्रमाणपत्र सहज मिळतात, यासंदर्भात स्टिंग ऑपरेशन केले होते. हे स्टिंग ऑपरेशन अयोग्य असल्याचे म्हणत नागपूर हायकोर्टाने स्टिंग ऑपरेशन करणाऱ्यावरच गुन्हे दाखल करण्याचे बुलढाणा पोलिसांना आदेश दिले होते. यावरून पोलिसांनी मुकीम अहमद सह त्यांचे तीन कार्यक्रत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहेय. त्यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणालाही बोगस अपंग प्रमाणपत्र पैसे घेऊन दिले जात आहे, याचाच भांडाफोड़ करण्यासाठी मुकीम अहमदने अकोलाचे तत्कालीन जिल्हाधिकारी मुत्थुकृष्णन शंकरनारायण हे ७० टक्के कर्णबधिर असल्याचे अपंग प्रमाणपत्र रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टरांकडून बनवून घेत त्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी मुथ्थुकृष्णन यांच्या तक्रारारींवरून अपंग बोर्ड मधील डॉ जे.बी. राजपूत, डॉ. प्रदीप आवाके, डॉ अशोक हिवाळे व इतर २ अशा ५ लोकांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात या तिन्ही डॉक्टरांच्या पॅनलने नागपूर हायकोर्टात धाव घेऊन गुन्हा खारिज करण्याची विनंती केली. सदर प्रकरणाची सुनावणी सुरु असताना हायकोर्टाने स्टिंग ऑपरेशन करणारे मुकीम अहमद, अमीर मुक्तार, मोहमद तौसिफ़, समीर खान यांच्यावर स्टिंग ऑपरेशन गैर असल्याचा निर्वाळा देत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून पोलीसांनी स्टिंग करणाऱ्या चारही लोकांवर कलम ४२०, ४५८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करून कोर्टात उभे केले असता त्यांना १४ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.