भाजपला मोठा धक्का; तेलगू देसम सरकारमधून बाहेर…

(प्रतिनिधी):- ईशान्य भारतामध्ये मिळालेल्या विजयानंतर दक्षिण भारतावर लक्ष्य केंद्रीत केलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलगू देसमचे मंत्री आज गुरुवारी राजीनामा देणार आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशीरा ही घोषणा केली. तेलगू देसम पक्षाचे केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री आहेत. नायडूंच्या या घोषणेनंतर हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी आज गुरुवारी राजीनामा देणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेशला योग्य वाटा मिळाला नसल्याने चंद्राबाबू नायडू नाराज होते. ‘आम्ही बजेट जाहीर झाल्यापासून आमची मागणी मांडत होतो, तरी केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. विशेष राज्याचा दर्जा हा आमचा हक्क आहे. त्याची केंद्राने पूर्तता केली नाही. गेली चार वर्ष आम्ही याबात संयम पाळला. केंद्र सरकारचे मन सर्व प्रकारे वळवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सत्तेची हाव नाही’, असे नायडू यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. ‘एक जबाबदार राजकारणी या नात्याने आम्ही हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही’ असेही नायडू यांनी सांगितले.