दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना साखर झाली कडु, तर अंत्योदय कुटुंबाची साखर महागली…

(प्रतिनिधी):- सरकारने एक कडू निर्णय घेतला असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानांवर आता यापुढे साखर मिळणार नाही. सरकारच्या या निर्णयाचा फटका राज्यातील ४५ लाख कुटुंबांना बसणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली आहे. याआधी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशनवर साखर देण्यात येत होती, मात्र त्यानंतर ती बंद करण्यात आली. दरम्यानच्या काळात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने दारिद्रय रेषेखालील लोकांना ‘साखरबंदी’ लागू झाली आहे. दुसरीकडे अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबांना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत. त्यामुळे अंत्योदय योजनेतील कुटुंबांना रेशनवर एक किलो साखर २० रुपयांना मिळणार आहे. पूर्वी एक किलो साखर १५ रुपयांना मिळत होती.