अर्थसंकल्पावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने…

(प्रतिनिधी):- राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्यामुळे अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेस आमदारांनी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन जोरदार निदर्शने केली. २०१८-१९ या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा मिळाल्याचे सांगून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक भोपळा हातात घेऊन नारेबाजी केली व आपला असंतोष व्यक्त केला. तर इतर आमदारांनीही यावेळी हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सर्वच समाजघटकांची पाटी कोरी राहिल्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून या आमदारांनी हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या. “महाराष्ट्राला काय मिळाले?… भोपळा… भोपळा”, “सरकारची आश्वासने निघाली खोटी, सर्वसामान्यांची कोरी पाटी… कोरी पाटी” या काँग्रेस आमदारांच्या घोषणांनी विधानभवन दुमदुमले होते.
विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारच्या काळात राज्याचा वृद्धी दर १० टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांवर आला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्राचा एवढा गाजावाजा केल्यानंतरही औद्योगिक वृद्धी दर ६.९ वरून ६.५ टक्क्यांवर घसरला आहे. हे सरकार किती धादांत खोटे बोलते, याचे उदाहरण कौशल्य विकास अभियानातून दिसून येते. या अभियानात सरकारने २ हजार ९११ प्रशिक्षण संस्थांना सूचिबद्ध केले असून, ८५ हजार उमेदवारांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. पुढील वर्षी १ लाख युवकांना रोजगार देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. पण यापूर्वी सूचिबद्ध केलेल्या सर्वच्या सर्व २ हजार ९११ प्रशिक्षण संस्था आज निधीअभावी बंद पडल्या आहे. वस्तुस्थिती इतकी भयावह आहे की, कौशल्य प्रशिक्षण संस्था चालकांवर आत्महत्येची वेळ आल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींसाठी गांधीजींचा चष्मा वापरणाऱ्या या सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही गांधीजींच्या विचारांचे प्रतिबिंब दिसले नाही. सामाजिक क्षेत्रांवरील तरतुदीत सातत्याने कपात करून गरीब, उपेक्षित, वंचित, दलित, आदिवासी,अल्पसंख्यांक, महिला या घटकांची उपेक्षा केली आहे. गांधीजींनी समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार मांडला होता. हा विचार या अर्थसंकल्पामध्ये कुठेही दिसून येत नाही. शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला, बालके हे घटकच सरकारच्या अजेंड्यावर नाहीत, हे या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी “परिवर्तन का ज्वार लाये है… सबका साथ सबका विकास किये महाराष्ट्र को उभार रहे हैं…”, या ओळी वापरल्या. विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांच्या कवितेला कवितेतूनच उत्तर दिले. “आत्महत्याओं का ज्वार लाये हैं… जनता का घात, मंत्रीयों का विकास किये ये तो महाराष्ट्र को डुबा रहे हैं…” या शब्दात त्यांनी अर्थमंत्र्यांच्या कवितेचा रोखठोक प्रत्युत्तर दिले.