विदर्भाच्या वीर महिलेने रोवला किलिमंजारो पर्वतावर भारताचा राष्ट्रध्वज…

0
45

(प्रतिनिधी):- विदर्भातील पहिली महिला वैमानिक प्रियंका राजेश सोनी यांनी बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो पर्वतावर भारताचा राष्ट्रध्वज रोवला आहे. आठ दिवसांत सर्वांत अवघड मार्गाने १९ हजार ३४१ फूट उंचीचे जगातील चौथ्या क्रमांकाचे पर्वत सर करून परतण्याचा गौरव तिने मिळविला आहे.
प्रियंका ही इंडिगो एअरलाइन्समध्ये महिला वैमानिक म्हणून कार्यरत आहे. अमेरिकेच्या मियामी शहरात तिने वैमानिकांसाठी आवश्यक अभ्यासक्रम (सीपीएल) पूर्ण केला, तर जर्मनीच्या ब्रुसेल्स शहरातून एटीपीएल मिळविले. प्रियंका ही नेहमी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगणारी. यातूनच तिने हिमाचल प्रदेशातील नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनीअरिंगमधून रीतसर प्रशिक्षण घेतले. यानंतर हिमालयातील तिने हिमकुंड साहेब, माऊंट कमानो, मचहर, स्टॉक कांगरी ही शिखरे सर केली. यानंतर तिचे लक्ष्य होते माऊंट किलीमंजारो. दक्षिण आफ्रिकेतील हे शिखर सर्वोच्च सातपैकी चौथ्या क्रमांकावर असून, चहुबाजूंनी सुप्त ज्वालामुखीनी घेरलेला आहे. तिने निवडलेला मार्ग हा सरळसोट चढाईचा होता. त्यातच तापमान -२० ते -३० अंशाच्या आसपास तापमान होते. अशा स्थितीत आठ दिवसांत शिखराची चढाई करून परतण्याची अदभूत किमया प्रियंकाने केली आहे. १ ते ७ मार्च दरम्यान ही मोहीम आखली होती. यात सुमारे २५ देशांतील प्रतिनिधी सामील झाले होते. मात्र, थंड हवामानाचा धसका घेऊन अनेकांनी माघार घेतली. प्रियकांने मात्र त्याची तमा न बाळगता माऊंट किलीमंजारोवर भारताचा राष्ट्रध्वज मोठय़ा अभिमानाने रोवला.