आदिवासी ठाकूर समाजाची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ मार्गी लावणार

0
113

काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे आश्वासन…

(प्रतिनिधी):- आदिवासी ठाकूर समाजाची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ मार्गी लावू तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे.

आदिवासी ठाकूर समाजाची जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असल्याने विद्यार्थ्यांसह नोकरदार व ठाकूर समाजातील लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र  मिळत नाही. याचा फटका राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि नोकरदारांना बसत आहे. तसेच ठाकूर समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीही मिळत नाही यासह इतर मागण्यांसाठी आदिम अनुसूचित ठाकूर जमात मंडळ महाराष्ट्र या संघटनेने आत्माराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु केले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी आझाद मैदानात जाऊन ठाकूर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला व शिष्टमंडळ घेऊन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली. जातपडताळणीसह आदिवासी समाजाच्या इतर मागण्यांबाबत पंधरा दिवसांच्या आत बैठक घेऊन त्या पूर्ण करू असे आश्वासन विष्णू सावरा यांनी या शिष्टमंडळाला दिले. या बैठकीनंतर डॉ. राजू वाघमारे यांनी आझाद मैदानात जाऊन आदिम अनुसूचित ठाकूर समाजाच्या उपोषकर्त्या कार्यकर्त्यांना लिंबू शरबत देऊन त्यांचे उपोषण सोडवले.