अस्वलाने केला शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला….

0
109

(प्रतिनिधी : रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील घुबडी येथील शेतक-यावर शेतीची कामे सुरु असताना अस्वलाने अचानक  हल्ला केला. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुरज संतोषराव आत्राम ह्या १८ वर्षीय शेतक-यांचे नाव आहे.
मान्सूनचं आगमन लवकरच होणार असल्याने शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. आज दुपारी तालुक्यातील घुबडी येथील शेतकरी सुरज हा प्रादेशिक वनवृत्ताच्या भागातील वडवाट येथील शेतशिवारामध्ये काम करित असताना तिथे दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्याचेवर हल्ला केला,यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला.त्याला उपचारार्थ तात्काळ पाटणबोरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.मात्र त्याला गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी अदिलाबाद येथे रवाना करण्यात आले आहे. शेतकर-यावर झालेल्या हल्ल्याने या परिसरात चांगलीच धास्ती पसरलेली आहे.